(मुंबई)
इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (IRS) अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात दाखल खंडणी प्रकरणाचा तपास ३ महिन्यांत पूर्ण करू, अशी ग्वाही CBI ने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान कडून कथितपणे २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर करण्यात आला होता. हा आरोप 2021 मधील कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असून, देशभरात या प्रकरणाने मोठा गाजावाजा झाला होता.
CBIच्या संथगतीवर हायकोर्टाची तीव्र नाराजी
तपास प्रक्रियेच्या संथ गतीवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत CBIला फटकारलं. “हा तपास पूर्ण करायला अजून किती वर्षं लागणार? १० की २०?”, असा सवाल करत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यावर CBIने तपास ३ महिन्यांत पूर्ण करण्याची लेखी ग्वाही दिली. न्यायालयाने ती नोंद घेतली असून, संबंधित याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करण्यात आली आहे. यावेळी कोर्टाने स्पष्ट केलं की, न्यायालयाच्या परवानगीने CBI आरोपपत्र दाखल करू शकते.
प्रकरण काय आहे?
2021 मध्ये समीर वानखेडे एनसीबी (Narcotics Control Bureau) चे विभागीय प्रमुख असताना त्यांनी ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर छापा टाकला होता. या छाप्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणानंतर वानखेडेंवर शाहरुखकडून २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप झाला. या प्रकरणी CBIने समीर वानखेडेंविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
समीर वानखेडे यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र गेली २ वर्षं या प्रकरणात नियमित सुनावणी होत नाही. CBIकडून वारंवार अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनुपलब्ध असल्याचं कारण देत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. याचा प्रभाव वानखेडे यांच्या बढतीवर होत आहे, असा युक्तिवाद त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पौंडा यांनी केला.
समीर वानखेडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मी नेहमीच निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे काम केलं आहे. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. एका राजकीय व्यक्तीकडून सतत लक्ष ठेवण्यात आलं. माझ्या कुटुंबियांवर आरोप करण्यात आले, माझे खाजगी फोटो लीक करण्यात आले. हे सर्व आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत,” असं वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं आहे.
NCBच्यावतीनेही न्यायालयात म्हटलं गेलं की, “अधिकाऱ्यांवर खंडणीचे आरोप करून तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न होत आहे. वानखेडे यांच्यासह एनसीबीचे सर्व अधिकारी स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिक सेवा नोंद ठेवून मुंबई ड्रग्समुक्त करण्यासाठी झटत आहेत.“
सीबीआयने आता तपासासाठी तीन महिन्यांची मुदत मागितल्याने, या प्रकरणात आगामी काही महिने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. वानखेडे यांची याचिका, आरोपपत्र सादरीकरण आणि संभाव्य तपास निष्कर्ष या सर्व गोष्टींवर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले आहे.