(सातारा)
सातारा जिल्ह्यातील शिवथर गावात घडलेली विवाहितेच्या हत्येची धक्कादायक घटना उकलण्यात ग्रामीण पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. गावातीलच अक्षय रामचंद्र साबळे या तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीची गळा चिरून निर्घृण हत्या केली. ही घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासांत पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली आहे.
पूजा जाधव या तरुणीचे 2017 मध्ये प्रथमेश जाधव या तरुणाबरोब लग्न झाले होते. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रेमविवाह होता. लग्नानंतर पूजाला एक मुलगा ही झाला. याच काळात तिचे गावातल्याच अक्षय साबळे या तरुणा बरोबर सुत जुळले. दोघांचे ही प्रेमसंबंध सुरू होते. अक्षयला काही करून पूजा बरोबर लग्न करायचे होते. तो तिला तिच्या मुलासह स्विकारायला तयार होता. पण पूजाचा लग्नासाठी नकार होता. ती लग्न करण्यास टाळाटाळ करत होती. मात्र त्याने तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता.
मृत महिला पूजा जाधव हिचं घर शिवथर गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. त्या वस्तीवर फक्त पाच-सहा घरे असून, घटनेच्या दिवशी दुपारी परिसरात शुकशुकाट होता. पूजाचे पती कामावर गेले होते तर सासू-सासरे शेतात होते. घरात पूजा एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत अक्षय घरात शिरला. दोघांमध्ये लग्नासंबंधी वाद झाल्याने अक्षयने संतापाच्या भरात तिच्या गळ्यावर धारदार कटरने वार करत तिचा निर्घृण खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला.
अवघ्या 8 तासांत आरोपी पुण्यात सापडला
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक माहितीच्या आधारे अक्षय साबळेवर संशय घेतला गेला. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा पुण्यातील स्वारगेट परिसरात असल्याचे शोधून काढले. सातारा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (डी.बी.) पथकाने पुण्यात जाऊन त्याला अटक केली.
प्रेमसंबंधातून खून; आरोपीची कबुली
प्राथमिक चौकशीत अक्षयने खुनाची कबुली दिली आहे. त्याने पूजेसोबत पळून जाण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, पूजाने त्याला स्पष्ट नकार दिला होता. या नकारातून चिडून त्याने तिचा खून केल्याचं मान्य केलं आहे. शिवथर गावातील अनेकांना अक्षय आणि पूजाचे प्रेमसंबंध असल्याची कुणकुण होती, त्यामुळे पोलिसांना तपास करताना फारशी अडचण झाली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.