देशभरातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या, 9 जुलै रोजी देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांविरोधात या संपाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात २५ कोटींहून अधिक कामगार सहभागी होण्याची शक्यता असून, त्याचा मोठा परिणाम संपूर्ण देशभरातील दैनंदिन सेवांवर होणार आहे. शाळा कॉलेज बंद ठेवण्याबद्दल अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवर प्रशासन निर्णय घेण्याची शक्यता आहे.
या संघटना बंदमध्ये सहभागी
भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्या प्रमुख कामगार संघटना:
-
AITUC (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस)
-
CITU (सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स)
-
HMS, INTUC, INUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF, UTUC
संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांची आघाडी यांचाही बंदाला पाठिंबा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही बंदचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. एकमेव महत्त्वाची बाब म्हणजे, भारतीय मजदूर संघ (RSS संलग्न) या बंदमध्ये सहभागी होणार नाही.
बंद मागे घेण्यास नकार का?
संघटनांचे म्हणणे आहे की, त्यांनी कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे १७ कलमी मागण्यांची यादी सादर केली होती. परंतु, यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा चर्चा झाली नाही. संघटनांचे मुख्य आक्षेप:
-
नवीन कामगार संहितेद्वारे संघटनांची ताकद कमी केली जात आहे
-
कामाचे तास वाढवले जात आहेत
-
कामगार हक्कांमध्ये कपात केली जात आहे
-
वर्षांनुवर्षे वार्षिक कामगार परिषदा रद्द केल्या जात आहेत
-
सरकारचे धोरण केवळ उद्योगपतीधार्जिणे असल्याचा आरोप
कामगार संघटनांनी यापूर्वीही 26 नोव्हेंबर 2020, 28-29 मार्च 2022 आणि 16 फेब्रुवारी 2024 रोजी अशाच प्रकारचा देशव्यापी संप पुकारला होता. त्यातही व्यापक प्रतिसाद मिळाला होता. आता 2025 मध्येही तितकाच मोठा बंद अपेक्षित आहे.
काय बंद आणि काय सुरू राहील?
भारत बंदमुळे खालील सेवा पूर्णतः अथवा अंशतः विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
पोस्ट ऑफिस, बँकिंग सेवा
-
सरकारी विमा कंपन्या
-
कोळसा व खाणकाम
-
राज्य परिवहन सेवा
-
महामार्ग, रस्ते व बांधकाम
-
काही सरकारी उत्पादन युनिट्स, सरकारी कारखाने आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे उत्पादन कार्य
यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक व्यवहार, प्रवास, आणि सरकारी सेवेतील दैनंदिन कामकाजात अडथळा येण्याची शक्यता आहे.
सुरू राहणाऱ्या सेवा:
-
खासगी कंपन्यांचे बहुतेक कार्यालये व उद्योग
-
रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा
-
खाजगी शाळा, महाविद्यालये व ऑनलाइन क्लासेस
-
इतर ई-कॉमर्स व डिजिटल सेवा
AITUC नेत्या अमरजीत कौर यांनी सांगितले की, देशभरात २५ कोटींहून अधिक कामगार व शेतकरी या संपात सहभागी होणार आहेत. हिंद मजदूर सभेचे नेते हरभजन सिंग सिद्धू यांनी म्हटले की, या बंदमुळे बँकिंग, पोस्ट, कोळसा खाण, कारखाने आणि परिवहन व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
9 जुलै रोजीचा भारत बंद हे केंद्र सरकारच्या धोरणांवर एक मोठे जनतेचे उत्तर असणार आहे. देशभरातील कामगार आणि शेतकरी यांचा सहभाग असल्याने बंदाचा परिणाम व्यापक असेल. अनेक शहरांमध्ये कामगार संघटना आणि सहयोगी गटांनी काढलेल्या निषेध मोर्चा आणि रस्त्यावरील निदर्शनांमुळे सार्वजनिक बसेस, टॅक्सी आणि अॅप-आधारित कॅब सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

