(रत्नागिरी / वार्ताहर)
उद्योगक्षेत्रातील आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण आणि औद्योगिक सुरक्षिततेची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथील विज्ञान शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्ष बी.एस्सी. (रसायनशास्त्र) विभागातील विद्यार्थ्यांची फिनोलेक्स इंडस्ट्रीज, रत्नागिरी येथे औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली.
या भेटीदरम्यान ४७ विद्यार्थ्यांनी पीव्हीसी रेझिन आणि पीव्हीसी पाइप निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. कंपनीतील तांत्रिक व वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी उत्पादन प्रक्रियेतील विविध टप्पे, गुणवत्ता नियंत्रण प्रणाली, स्वयंचलित उत्पादन तंत्रज्ञान तसेच औद्योगिक सुरक्षिततेच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांना अत्याधुनिक यंत्रसामग्री, विविध उत्पादन विभाग तसेच पूर्णपणे स्वयंचलित कंट्रोल पॅनलद्वारे चालणाऱ्या उत्पादन प्रक्रियेचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली. या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवाची जोड मिळाली. या भेटीत रसायनशास्त्र विभागाचे डॉ. स्वामीनाथ भट्टर, डॉ. उमेश संकपाळ आणि डॉ. मेघना म्हादये-घुमे सहभागी झाले. विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे नियोजन करण्यात आले.
फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे माधव साळस्कर आणि श्रुती शिंदे (एचआर) यांनी भेटीचे समन्वयन करत विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

