(रत्नागिरी)
जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ९,१९० कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचे अनावरण जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समिती (DCC) आणि जिल्हास्तरीय समीक्षा समिती (DLRC) यांच्या संयुक्त बैठकीत हा आराखडा जाहीर करण्यात आला.
एकूण पत आराखड्यापैकी ६,२६० कोटी रुपये प्राधान्य क्षेत्रासाठी (Priority Sector) राखीव ठेवण्यात आले असून, कृषी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) तसेच इतर प्राधान्य क्षेत्रांना याचा लाभ होणार आहे.
प्राधान्य क्षेत्रातील कर्जलक्ष्य
कृषी क्षेत्र : २,६०० कोटी रुपये
उद्योग (MSME) : २,३५६ कोटी रुपये
इतर प्राधान्य क्षेत्र : १,३०४ कोटी रुपये
एकूण प्राधान्य क्षेत्र : ६,२६० कोटी रुपये
एकूण वार्षिक पत आराखडा : ९,१९० कोटी रुपये
यंदाच्या पत आराखडा पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त विशेष चित्र प्रकाशित करून त्यांना अभिवादन करण्यात आले आहे.
बैठकीत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील बँकिंग कामकाजाचा आढावा घेतला. कृषी, शिक्षण आणि मुद्रा कर्ज वितरणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँकांचे त्यांनी कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँक समन्वयक आणि शाखा व्यवस्थापकांचा मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
बैठकीस अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, रिझर्व्ह बँकेच्या (RBI) एलडीओ बेनझीर शेख, नाबार्ड (NABARD) चे जिल्हा विकास व्यवस्थापक (DDM) महेश टिळेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले तसेच विविध बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

