(रत्नागिरी / वार्ताहर)
गणपतीपुळे येथील २० वर्षीय सायकलपटू अथर्व शेंड्ये याने ‘सायकल एव्हरेस्टिंग’ हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करून रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयातर्फे त्याचा सन्मानचिन्ह, वाचनीय पुस्तक, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी आणि सरपंच अमर रहाटे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना अथर्व शेंड्ये म्हणाला, “गावातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे. सायकलिंगच्या विविध स्पर्धांमधून करिअरच्या संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील. चला, एकत्र सायकलिंगची चळवळ उभी करूया.”
अथर्वने टेंबेपूल ते चाळकेवाडी जलशुद्धीकरण केंद्र हा कठीण चढाव तब्बल ७० वेळा पार करत सलग ४१ तासांत ५०० किलोमीटरहून अधिक सायकलिंग केले. या प्रवासात त्याने १०,००० मीटरपेक्षा अधिक उंचीची चढाई पूर्ण करत ‘सायकल एव्हरेस्टिंग’चा मानाचा किताब पटकावला. यावेळी श्री रत्नेश्वर ग्रंथालयातर्फे माध्यमिक विद्यालय, धामणसेला क्रीडा साहित्य, नकाशे तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला कंपास पेटीचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास उपसरपंच ऋतुजा कुळकर्णी, रत्नागिरीच्या नगरसेविका मेधा कुळकर्णी, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे कार्यकारिणी सदस्य व पत्रकार मकरंद पटवर्धन, श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, उपाध्यक्ष अविनाश जोशी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय निवेंडकर, सोसायटीचे सचिव सुनील लोगडे, दीपक जाधव, ग्रंथालयाचे चिटणीस मुकुंद (बाळासाहेब) जोशी, उपाध्यक्ष विलास पांचाळ, केशव कुळकर्णी, प्रशांत रहाटे, विश्वास धनावडे, अनंत जाधव, स्मिता कुळकर्णी, अविनाश लोगडे, अन्वी वारशे, ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी धनावडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा ढापरे, अंगणवाडी सेविका, बचत गट प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक महेश धनावडे यांनी केले.

