(रत्नागिरी)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत रत्नागिरी जिल्हाभर ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचे’ आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत जिल्ह्यात सुमारे २०० मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. हे अभियान जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या समन्वयातून राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (रत्नागिरी), जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग (NCD) कार्यक्रम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक तसेच संलग्न खाजगी रुग्णालयांचा सहभाग असून नागरिकांना विविध मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
शिबिरांमध्ये ईसीजी, बीएमआय, विविध रक्तचाचण्या, कर्करोग, मधुमेह व लेप्टोस्पायरोसिस तपासणी, आरोग्य समुपदेशन, गरोदर महिलांची तपासणी, लहान मुलांची आरोग्य तपासणी आणि मोफत लसीकरण अशा सुविधा दिल्या जात आहेत.
याशिवाय सावर्डे येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाच्या सहकार्याने लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया तसेच मूळव्याध, भगंदर आणि फिशर यांसारख्या आजारांवर मोफत लेसर शस्त्रक्रिया शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व गरजू नागरिकांनी या मोफत जनआरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष डॉ. सुमित सावंत आणि समाजसेवा अधीक्षक केदार ढेकणे यांनी केले आहे. शिबिरांच्या वेळापत्रकाची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

