(राजापूर / प्रतिनिधी)
मोबाईल चार्जर राहिल्याचे सांगून दुकानाची चावी घेऊन दुकानातून मोबाईल चोरून ऑनलाईन अँपद्वारे सुमारे ₹२.५९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जावयाविरुद्ध राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फसवणुकीनंतर सासूला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी जायदा मुनीर काझी (वय–अज्ञात, व्यवसाय–गृहिणी व मालकीण, अमन जनरल स्टोअर्स, रा. ओणी कोंडीवळे, ता. राजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी दानिश हेमंत काझी (वय २९, रा. वडवली, सध्या वास्तव्य- अँटॉप हिल, मुंबई) हा त्यांचा जावई आहे. २६ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपीने “चार्जर दुकानात राहिला आहे” असे सांगत विश्वास संपादन करून दुकानाची चावी घेतली. त्यानंतर त्याने दुकानातील मोबाईल चोरून त्यामधील फोन पे अँपचा गैरवापर करून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ₹२,५९,०७०/- इतकी रक्कम हस्तांतरित केली. या फसवणुकीनंतर, फिर्यादीने विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गु. र. क्र. १२९/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३१८(४), ३१६(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

