(राजापूर / तुषार पाचलकर )
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार तथा नगराध्यक्ष राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी यांना रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेने अथर्व साळवी यांच्या ऐवजी भाजपचे माजी नगरसेवक मुन्ना चवंडे यांना धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे राजन साळवी यांना रत्नागिरीत मोठा झटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
प्रभाग क्रमांक 15 मधूनच राजन साळवी यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली. तर कालांतराने रत्नागिरीचे नगराध्यक्षपद देखील राजन साळवी यांनी भूषवले आहे. राजन साळवी यांचा मुलगा अथर्व हेही प्रभाग क्रमांक 15 मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक होते. मात्र शिवसेनेने राजन साळवी यांच्या मुलाला उमेदवारी नाकारली आहे.
अथर्व साळवी यांना उमेदवारी न मिळाल्याने राजन साळवी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता आपण पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याकरिता धाराशिव येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना आपण नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचा निर्णय अंतिम असल्याचे आणि तो आपल्याला मान्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या मुलाला जरी उमेदवारी नाकारली असली तरी आपण महायुतीचा धर्म पाळणार असून रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा जोमाने प्रचार करणार आणि सर्व उमेदवारांना निवडून आणणार असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.

