(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
कसबा येथील गणेश कला मंदिर ही एक अशी जागा आहे, जिथे गेली ७५ वर्षे गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा जिवंत ठेवली आहे. आजही येथे दरवर्षी सुमारे ३५० हून अधिक शाडूमातीच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या जातात. या परंपरेचे संवर्धन करणारे कलावंत म्हणजे ज्येष्ठ मूर्तिकार श्री. मुरलीधर बोरसुतकर गुरुजी.
गुरुजींच्या वडिलांनी कै. विठ्ठल लक्ष्मण बोरसुतकर यांनी १९५२ मध्ये या कलेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या निधनानंतर, मुरलीधर बोरसुतकर यांनी १९७४ पासून शृंगारपूर येथे काही वर्षे मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. त्या काळात मूर्तींची संख्या मर्यादित होती. मात्र, १९७८ पासून त्यांनी कसबा येथेच आपल्या राहत्या घरी शाडूमातीच्या गणेशमूर्ती तयार करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.
गुरुजी दरवर्षी मे महिन्यापासून मूर्ती तयार करण्याच्या कामाला आरंभ करतात. त्यांच्या कारखान्यात एक फूट उंचीपासून ते चार फूट उंचीपर्यंतच्या विविध मूर्ती तयार केल्या जातात. यामध्ये – घोड्यावर आरूढ गणपती, फुलांमधून अवतरलेला गणपती, उंदरावर विराजमान गणपती, दगडूशेठ हलवाई स्टाईल, लालबागच्या राजाची प्रतिकृती अशा नानाविध आकर्षक मूर्तींचा समावेश आहे.
यावर्षी गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असल्यामुळे मूर्तिकारांवर वेळेचा ताण अधिक आहे. कमी कालावधीत अधिक मूर्ती तयार करण्याचे आव्हान असले, तरीही गुणवत्ता आणि कलात्मकता यांच्यात तडजोड न करता गुरुजी आणि त्यांची टीम काम करत आहेत.
७५ वर्षांची परंपरा, तितक्याच ताकदीने जपलेली निष्ठा आणि मातीतील सृजनशक्ती श्री. मुरलीधर बोरसुतकर गुरुजींच्या कार्यातून उलगडते. गणेशोत्सव म्हणजे केवळ सण नव्हे, तर एक सांस्कृतिक वारसा आहे, आणि त्या वारशाचे मूर्त रूप म्हणजे ‘गणेश कला मंदिर’.

