(देवरुख)
डिंगणी ग्रामविकास मंडळ, मुंबई यांच्या वतीने केदारेश्वर माध्यमिक विद्या मंदिर, डिंगणी येथील माजी विद्यार्थ्यांची सभा शिरोडकर हायस्कूल, परळ येथे पार पडली. या सभेत माजी विद्यार्थी संघाची औपचारिक स्थापना करण्यात आली.
संघाच्या अध्यक्षपदी प्रदीप पाकतेकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून सुधीर प्रदीप चाळके, खजिनदार म्हणून महेश मिरगल, सहसचिव म्हणून प्रदीप काष्टे तर सदस्यपदी दिपेश दिलीप चाळके, मंगेश पाताडे यांच्यासह इतर सदस्यांची निवड करण्यात आली.
माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवणे, माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या विकास प्रक्रियेत थेट सहभागी करून घेणे, तसेच ग्रामीण व शहरी भागातील शिक्षणाचा दर्जा समान पातळीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशातून सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा देखील या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
याशिवाय माजी विद्यार्थ्यांचे आपल्या गावाशी व मातीशी नाते अधिक दृढ करणे आणि शाळा व समाज यांच्यात मजबूत दुवा निर्माण करणे, यावरही भर देण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबवण्यात आला.
या वेळी डिंगणी ग्रामविकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष पांडुरंग पेजे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडून केदारेश्वर माध्यमिक विद्या मंदिर, डिंगणी येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.

