(देवरुख)
शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एक आरोपी स्थानिक असून दुसरा मुंबईतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासह या प्रकरणातील संशयितांची संख्या आता सहावर पोहोचली आहे.
अपहरण प्रकरणात भडकंबा येथील प्रणित संजय दुधाणे (३०, पटवाडी), राजेश अनंत नवाले (३५, नवालेवाडी), दीपक राजेश लोहिरे (३७, बदलापूर पूर्व, ठाणे) आणि विशाल मनोहर आचार्य (४५, आपटेवाडी, बदलापूर पूर्व, ठाणे) यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. या चौघांना देवरुख न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
केतकर यांचे अपहरण १७ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास वांझोळे येथे झाले होते. ते चारचाकी वाहनाने साखरपाहून देवरुखकडे परतत असताना अज्ञातांनी त्यांना जबरदस्तीने पळवून नेले. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या जवळील १४ लाख रुपयांचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम लुटून त्यांना वाटूळ येथे सोडून दिले. या घटनेनंतर केतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि देवरुख पोलीस मिळून करत असून, मंगळवारी चौघांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना ताब्यात घेतल्यामुळे तपासाला गती मिळाली आहे.

