(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील रहिवासी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दीर्घकाळ सक्रिय असलेले रुपेश उर्फ बाळा शेट्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उपतालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र हा निर्णय पूर्णतः वैयक्तिक कारणांमुळे घेतल्याचे शेट्ये यांनी स्पष्ट केले आहे.
रुपेश शेट्ये हे सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी संगमेश्वर तालुक्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी, निवडणूक नियोजन तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. उपतालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला, तरी पक्षाशी असलेली आपली निष्ठा कायम असल्याचे शेट्ये यांनी सांगितले. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी बांधिलकी ठेवून सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजीनाम्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असले, तरी पक्षात कोणताही अंतर्गत मतभेद नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. हा निर्णय पक्षसंघटनेच्या हिताला धक्का देणारा नसून, संघटनात्मक कामकाजात पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

