( चिपळूण )
शहरातील वाढत्या अनधिकृत फलकबाजीला लगाम घालण्यासाठी चिपळूण नगर परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचाच भाग म्हणून विशेष पथकाने सोमवारी (७ जुलै) शहरातील तीन मोठे क्यूआर कोड नसलेले फलक जप्त केले. हे फलक सध्या नगर परिषद कार्यालयात ठेवण्यात आले असून, कारवाईला आणखी गती देण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. परवानगी मिळाल्यानंतर संबंधित फलकावर अधिकृत क्यूआर कोड छापणे आवश्यक आहे. या कोडच्या आधारे फलकाची वैधता तपासता येते. मात्र अनेक ठिकाणी ही अट पाळली जात नसल्याने नगर परिषदेला कारवाईचा बडगा उगारावा लागला.
चिपळूण नगर परिषदेने विशेष पथक तयार करून शहरात नियमित गस्त सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत सोमवारी कारवाई करताना तीन अनधिकृत फलक आढळले. संबंधितांनी कोणतीही परवानगी न घेतल्याने आणि फलकावर क्यूआर कोड नसल्याने त्यांच्यावर थेट कारवाई करत फलक जप्त करण्यात आले. ही कारवाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले आणि बांधकाम विभाग प्रमुख संदेश टोपरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अनधिकृत फलक हटवण्याच्या या मोहिमेमुळे शहरात अधिक शिस्तबद्धता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

