(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पुन्हा शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. इंडिया गेट ते दिल्ली पोलीस मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात येणार असून, नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारामुळे पीडित कुटुंबीय आणि आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईला सामोरे गेलेल्या पीडित कुटुंबीयांकडून मोर्चाचे नेतृत्व करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाने प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सरकारला विविध प्रश्नांची उत्तरं सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. देशातील शाळांमधील विद्यार्थ्यांची स्थिती काय आहे, शिक्षणासाठी किती निधी खर्च केला जातो, शाळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि त्यापैकी प्रत्यक्षात किती खर्च झाला, याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
5 सप्टेंबरला पुन्हा दिल्लीमध्ये आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे मोर्चा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं. जुलै महिन्यात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असताना केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांकडून काही आश्वासनं देण्यात आली होती. या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील आंदोलन सद्भावनेने मागे घेण्यात आलं होतं. मात्र, सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरकारकडून वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप
सरकारकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीने केला आहे. तांत्रिक बाबींच्या आड लपून सरकारकडून स्पष्ट भूमिका घेण्याचं टाळलं जात असल्याचा दावाही पक्षाने केला आहे.
18 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशभरात नोंदवण्यात आलेल्या संबंधित FIRची यादी सादर करण्याबाबत केंद्र सरकारला निर्देश दिल्याचा उल्लेखही पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेली लेखी आश्वासनं अद्याप प्रलंबित असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी 5 सप्टेंबर रोजी पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पक्षाने स्पष्ट केलं.
शाळांमधील सुविधांबाबत सरकारकडे सहा प्रश्न
दरम्यान, अभिजीत दिपके यांनी शाळांमधील पायाभूत सुविधांबाबत सरकारकडे महत्त्वाची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या शाळांची स्थिती समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, बसण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचा पक्षाचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांत किती सरकारी शाळांचं नूतनीकरण करण्यात आलं आणि सध्या किती शाळांना दुरुस्ती किंवा संपूर्ण नूतनीकरणाची आवश्यकता आहे, याची माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच सरकारी शाळांमधील मंजूर शिक्षक पदांपैकी किती पदे भरली आहेत आणि किती पदे रिक्त आहेत, गेल्या पाच वर्षांत सरकारी शाळांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आणि त्यापैकी प्रत्यक्ष किती निधी खर्च करण्यात आला, याचा तपशीलही मागण्यात आला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाची समान संधी मिळण्यासाठी आणखी किती सरकारी शाळांची आवश्यकता आहे, याची माहितीही सरकारने द्यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. याशिवाय अध्यापनाव्यतिरिक्त सरकारी शाळांमधील शिक्षकांवर कोणती शिक्षणेतर कामं आणि जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत, याचाही तपशील सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संगणक, डिजिटल शिक्षण आणि स्वच्छतागृहांचीही माहिती मागितली
सध्या किती सरकारी शाळांमध्ये संगणक आणि डिजिटल शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत, किती शाळांमध्ये स्वच्छ आणि कार्यरत स्वच्छतागृहं आहेत, तसेच विद्यार्थ्यांसाठी योग्य क्रीडा सुविधा आणि क्रीडा साहित्य किती शाळांमध्ये उपलब्ध आहे, याची माहितीही सरकारने जाहीर करावी, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीने केली आहे.
सरकारने या सर्व प्रश्नांची माहिती सार्वजनिक करून शाळांमधील पायाभूत सुविधांची वास्तविक स्थिती स्पष्ट करावी, अशी भूमिका अभिजीत दिपके यांनी मांडली आहे. दरम्यान, 5 सप्टेंबरच्या दिल्ली मोर्चात या प्रश्नांसह नीट परीक्षेतील पीडित कुटुंबीयांच्या मागण्याही मांडल्या जाणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

