(मुंबई)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याने एका मराठी महिला सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजश्री बाबुराव मोरे (३९) यांच्या कारला राहिलच्या कारने धडक दिल्यानंतर, रस्त्यावर दोघांमध्ये वाद झाला. यावेळी राहिल शेख मद्यधुंद अवस्थेत असून त्याने तक्रारदार महिलेवर शिवीगाळ, धमकी आणि हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात राहिल शेखविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी पहाटे १.३० वाजता घडली. राजश्री मोरे या गोरेगाव येथील एका रुग्णालयातून घरी जात असताना, वीरा देसाई रोडवरील कंट्री क्लबजवळ राहिल शेखच्या कारने त्यांच्या कारला धडक दिली.
मोरे यांचे वाहन चालकाने पुढे जाऊन राहिलच्या कारला अडवले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, राहिल शेख पूर्णपणे मद्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेत होता. पोलिस घटनास्थळी दाखल होताच राहिलने तक्रारदार महिलेसोबतच पोलिसांनाही शिवीगाळ केली आणि आपल्या वडिलांचे (MNS नेते) नाव घेऊन धमक्या दिल्या.
तक्रारदार महिलेच्या आरोपानुसार, राहिल शेखने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन आंबोली पोलीस ठाण्यात आणले. राहिल शेखविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची कार जप्त करण्यात आली असून त्याला नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्याने आणि त्यात राजकीय नेत्याच्या मुलाचा सहभाग असल्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे. संबंधित पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
शिवसेना नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले की, “दारूच्या नशेत. अर्धनग्न. मनसे नेत्याचा मुलगा एका महिलेला शिवीगाळ करत आहे. शिवाय, तो त्याच्या वडिलांचा प्रभाव दाखवत आहे. मराठी स्वाभिमानाचे रक्षण करण्याचा दावा करणाऱ्यांचा खरा चेहरा पहा. हेच मनसेचे लोक आहेत का जे मुस्लिमांच्या दबावाखाली हिंदूंवर हल्ला करत आहेत?”

