(ठाणे)
अंबरनाथ शहरातून एक अत्यंत दु:खद आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार अपयश आल्याने आलेल्या तीव्र नैराश्यातून 26 वर्षीय तरुणीने स्वतःचे आयुष्य संपवले. या घटनेमुळे संपूर्ण अंबरनाथ परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील भेंडी पाडा परिसरात ही घटना घडली. ती अंबरनाथ पश्चिम भागातील स्वामीनगर भागात परिवारासह राहात होती. प्रतीक्षा राणे असे मृत तरुणीचे नाव असून ती गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलात भरती होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होती. खाकी वर्दी परिधान करून आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याची तिची तीव्र इच्छा होती. मात्र, प्रत्येक वेळी अपयश पदरी पडल्याने ती मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती समोर आली आहे.
सुसाईड नोटमधील शब्दांनी डोळे पाणावले
टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी प्रतीक्षाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत तिने आई-वडिलांची माफी मागत, “नोकरी लागल्यानंतर तुम्हाला जे आयुष्य द्यायचे होते, ते मी देऊ शकले नाही,” असे भावनिक शब्द लिहिले आहेत. ही चिठ्ठी वाचून कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकही भावुक झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाणे येथील पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रतीक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालय, उल्हासनगर येथे पाठवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद शब्बीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण
प्रतीक्षा राणे हिच्या दुर्दैवी निधनामुळे केवळ कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत करणाऱ्या तरुण-तरुणींमध्येही या घटनेमुळे अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यश-अपयशाच्या पलीकडे जाऊन आयुष्याचा सकारात्मक विचार करावा, अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे.
ही घटना तरुणांच्या मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित करत असून, अशा प्रसंगी योग्य समुपदेशन आणि कौटुंबिक आधार किती महत्त्वाचा आहे, हेही स्पष्ट करते

