(इस्लामाबाद /पाकिस्तान)
पाकिस्तानच्या राजधानीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या १७ वर्षांची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सना युसुफ हिचा अज्ञात हल्लेखोराने तिच्या घरात घुसून गोळ्या झाडून खून केला. या घटनेमुळे पाकिस्तानमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, सोशल मीडियावर या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
सना युसुफ हिचे टिकटॉकवर सुमारे ८ लाख, तर इन्स्टाग्रामवर ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. ती अल्पावधीतच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती आणि अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनली होती.
संध्याकाळी घरात घुसून गोळीबार
तक्रारीनुसार, एक अज्ञात तरुण ३ जून रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता सना हिच्या घरात घुसला. त्याने तिच्या पोटात दोन गोळ्या झाडल्या, ज्या गंभीर स्वरूपाच्या होत्या. सना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या आई फरजाना युसुफ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या घटनेनंतर पाकिस्तान दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हल्लेखोर ओळखीचा?
जिओ न्यूजच्या अहवालानुसार, सना आणि हल्लेखोर एकमेकांना ओळखत होते. सना हिच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या आधी सना हल्लेखोराला म्हणाली होती, “तू इथून निघून जा, इथे सर्व बाजूंनी कॅमेरे आहेत. तू अडकू शकतोस ” या संवादावरून असा संशय व्यक्त केला जात आहे की, दोघांमध्ये आधीपासून काही वैयक्तिक वाद किंवा संबंध होते, ज्यामुळे हल्लेखोराने हा टोकाचा निर्णय घेतला असावा. मात्र, या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी पाकिस्तान सरकारला महिलांच्या सुरक्षेबाबत जबाबदार धरण्याची मागणी केली आहे. इस्लामाबाद पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि सना युसुफचा सोशल मीडिया व्यवहार तपासण्याचे काम सुरू आहे.