( रायगड )
जिल्ह्यातील रेवदंडा येथील कोरलाई किनाऱ्याजवळ एका संशयास्पद बोटीच्या हालचालीमुळे खळबळ उडाली असून, किनारपट्टी सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. ही बोट पाकिस्तानी खुणा असलेली असून काही जण बोटीवरून उतरल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
कोरलाई किनाऱ्यापासून सुमारे दोन नॉटिकल मैल अंतरावर ही बोट आढळून आली. माहिती मिळताच रायगड पोलीस, बॉम्ब शोधक व निकामी करणारे पथक (BDDS), क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रात्री शोधमोहीम राबवण्यात आली. बोटीतून लाल दिवा दिसल्याने अधिकाऱ्यांनी तिच्याकडे लक्ष वेधले.
रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी थेट किनाऱ्यावर धाव घेतली. मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे बोटीजवळ जाणे कठीण झाले. दलाल यांनी स्वतः बार्जच्या साहाय्याने बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हवामानामुळे परतावे लागले.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून कोरलाई परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्हाभरात सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली आहे. या बोटीच्या तपासासाठी विविध सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
(पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार)