(रत्नागिरी)
तालुक्यातील टिके कांबळेवाडी फाटा येथे शिकार करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात सिंगल बॅरल बंदुक, 6 जिवंत काडतूस, कार आणि इतर साहित्य असा एकूण 1 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल बाळगणार्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2.20 वा. करण्यात आली.
अनिश अरुण रेडीज (24, रा.वाणीपेठ हरचेरी चांदेराई, रत्नागिरी) आणि संजय मधुकर महाजन (55,रा. निरखुणेवाडी चिंद्रवली, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल शांतराम झोरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी मध्यरात्री 2.20 वा.सुमारास दोन्ही संशयित आपल्या ताब्यात 45 हजारांची सिंगल बॅरल बंदुक, 6 जिवंत काडतूस, दोन टॉर्च, आणि 65 हजारांची वॅगनार कार मधून शिकर करण्याच्या उद्देशान फिरत असाना ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3(1),25,भारतीय न्याय संहिता कायदा कलम 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व शस्त्र परवाना धारकांना आपली शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यात जमा करण्याबाबत आवाहन केलेले आहे. ज्यांना शस्त्र स्वतःजवळ असावीत असे सकारण वाटते यांनी त्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात अर्ज करावा. तो अर्ज जिल्हा पोलिस अधिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवतील त्यानंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी मिळाली तरच शस्त्र परवानाधारक स्वतःचे शस्त्र स्वतःकडे ठेवू शकतो. आचारसंहिता झाल्यानंतर पोलिस ठाण्यात जमा झालेली शस्त्रे परत करण्यात येणार आहेत.