( रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे ९०० शिक्षकांची पदे रिक्त असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षात पटसंख्या अभावी ११ शाळांना बंद करण्याची वेळ आली आहे. परिणामी, शिक्षण विभागावर पालकांसह लोकप्रतिनिधींचा रोष ओढवला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, विविध उपक्रम आणि शिक्षक प्रशिक्षण दिले जात असले तरी, खासगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता कल ही शासकीय शाळांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत रोजगार आणि आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने गावाकडून शहराकडे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे, ज्याचा थेट परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येवर झाला आहे. परिणामी, काही शाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करावे लागत आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रत्येक तालुक्यात शाळाबाह्य तसेच स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, दरवर्षी घटणारी पटसंख्या ही शिक्षकांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे, कारण कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील शिक्षकांना अतिरिक्त घोषित केले जाऊ शकते.
पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड
शाळा वाचवण्यासाठी शिक्षकांना पटसंख्या वाढविण्यासाठी आटापिटा करावा लागत असून, गतवर्षी याच कारणामुळे काही शाळा बंद करण्यात आल्या होत्या. चालू वर्षीही ही स्थिती कायम असून, शासकीय शाळा टिकवणे हे शिक्षण विभागासमोरील मोठे आव्हान बनले आहे.