(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी)
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट सध्या बिकट अवस्थेत असून, दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्याने हा मार्ग धोकादायक झोनमध्ये गेला आहे. शासनाच्या निधीच्या प्रतीक्षेत असलेला हा घाट दरवर्षी डागडुजीच्या नावाखाली डांबरीकरणाच्या ढोंगात अडकलेला आहे.
समुद्रसपाटीपासून सुमारे ४ हजार फूट उंचीवर वसलेला रघुवीर घाट हा साधारण १० किमी लांबीचा असून, या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका सतत असतो. विशेषतः पावसाळ्याच्या काळात हा मार्ग प्रवाशांसाठी बंद ठेवावा लागतो. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा शहराशी संपर्क तुटतो. दरवर्षी डोंगरमाथ्यावरून मोठे दगड, मातीचा भराव आणि खडक घाट रस्त्यावर वाहून येत असल्यामुळे हा मार्ग पूर्णतः ठप्प होतो.
१९९०-९१ मध्ये रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांना जोडण्यासाठी राज्य शासनाने खेड तालुक्यातील खोपी गावातून घाटाचे काम सुरू केले. अनेक नैसर्गिक अडथळ्यांवर मात करत २००२ मध्ये रघुवीर घाट पूर्णत्वास गेला. या घाटाने कोकणातील खांदाटी खोऱ्यातील गावांना पुन्हा एकदा सातार्याशी जोडले. पण २० वर्षांनंतरही या घाटाचे सांभाळ करण्याचे काम रामभरोसे राहिले आहे. दरवर्षी डागडुजीचे नाव घेत काही प्रमाणात डांबरीकरण केले जाते. परंतु मूलगामी डोंगर धोक्याचे निवारण करण्यासाठी शासनस्तरावर कोणतीच ठोस कृती दिसून येत नाही.
‘दरडीचा घाट’ म्हणून ओळख निर्माण
दरड कोसळण्याच्या वारंवार घटनांमुळे रघुवीर घाटाला ‘दरडीचा घाट’ म्हणून ओळख मिळाली आहे. स्थानिकांप्रमाणेच पर्यटकांनाही या घाटाकडे आकर्षण वाटते. खेडपासून अवघ्या २२ किमी अंतरावर, पावसाळ्याच्या दिवसात घाटात पर्यटकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळते. घाटाच्या कुशीत उतरलेला पाऊस, धुक्याचे नृत्य आणि निसर्गाचा भारदस्त थाट यामुळे हा घाट प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून उभारी घेत आहे.
प्रशासकीय ‘दातृत्वाचा हात’ हवा
आजही घाटात सुरक्षा कठडे, दरडरोधक जाळी, रस्त्याची मजबुती, पर्यटकांसाठी सूचना फलक अशा मूलभूत गोष्टींचा अभाव आहे. रघुवीर घाटाची सांभाळणी, संरक्षण आणि विकास करण्यासाठी शासनाकडून विशेष निधीची गरज आहे. दुर्गम सह्याद्रीला फोडून उभारलेला हा घाट, दोन जिल्ह्यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरतोय, पण त्याला अजूनही प्रशासकीय दयेची वाट पाहावी लागते आहे.