(रत्नागिरी)
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथील बी ए योगशास्त्राचे विद्यार्थी विनय साने यांनी प्रथम प्रयत्नात प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नुकताच नागपूरमधील रामटेक विश्वविद्यालय परिसरात दीक्षांत समारंभ दि १६ एप्रिल २०२५ रोजी पार पडला. यावेळी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते व भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष व भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे श्री चमूकृष्ण शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत बी ए योगशास्त्राचे पदवी प्रमाणपत्र व सुवर्णपदक विनय साने यांना प्रदान करण्यात आले.
त्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांना दोन विशेष पारितोषिके मिळाली ज्यात स्व. श्रीमती सामरबाई करमशी जेठाभाई सोमय्या स्मृती सुवर्णपदक आणि गंगाधर घाटोळे यांनी प्रदान केलेले स्व. श्री नारायण जयराम घाटोळे स्मृती रोख पारितोषिक यांचा समावेश आहे.
विनय साने यांच्या या अभूतपूर्व यशाने रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी आणि रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी अभिनंदन केले आहे.