(रत्नागिरी)
शहरातील मिरकरवाडा परिसरात सोमवार, 1 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 12.15 ते 1 वाजेच्या दरम्यान भरदिवसा मोठी चोरीची घटना घडली. मिरकरवाडा येथील कारच्या मागील बाजूची काच फोडून अज्ञाताने तब्बल 10 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे.
शिकारी फिर्यादी मुबीन मोहम्मद मुल्ला (वय 50, रा. गोळप, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. फिर्यादी मच्छिमार व्यवसायाशी संबंधित असून, त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे एकूण 4 पर्सनेट बोटी आहेत, ज्यावर सुमारे 100 ते 125 खलाशी काम करतात. खलाशांचा आठवड्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी फेडरल बँकमधून 10 लाख रुपये रोख काढून एका निळ्या पिशवीत ठेवले होते. ही पिशवी त्यांनी आपल्या कार (MH-08-BE-5786) च्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला ठेवून मिरकरवाडा जेटी येथे गेले होते.
या संधीचा फायदा घेत अज्ञाताने कारच्या मागील डावी काच फोडून गाडीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ड्रायव्हर सीटखाली ठेवलेली पिशवी उचलून लांबवली. काही वेळानंतर मुबीन मुल्ला कार पार्क केलेल्या ठिकाणी परत आले असता, त्यांनी गाडीची काच फोडलेली आणि रोख रक्कम गायब असल्याचे पाहिले.
या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भारतीय दंड संहिता, 2023, कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, सध्या सखोल चौकशी सुरू आहे. पोलिस घटना स्थळी आणि आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचा तपास करत आहेत, तसेच संशयितांचा शोध घेत आहेत.

