(गुहागर / रामदास गमरे)
गुहागर पंचायत समितीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंढर ग्रामपंचायतीमध्ये कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी भूषविले, तर तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमातील मुख्य उपक्रम चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिक आणि ‘एक झाड आईच्या नावाने’ वृक्षारोपण मोहिमेची माहिती उपस्थितांना दिली.
प्रगतशील शेतकरी विजय भिकू रामाणे यांच्या शेतात चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी भिलारे व कृषी अधिकारी क्षीरसागर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कमी खर्चात व कमी खतांचा वापर करून जास्त उत्पादन देणाऱ्या चारसूत्री भात लागवड पद्धतीची सविस्तर माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, आणि सुधारित किंवा संकरित बियाण्यांचा वापर केल्याने उत्पादनक्षमतेत लक्षणीय वाढ होते. त्यामुळे रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय व पर्यावरणस्नेही पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
यानंतर ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून देताना अधिकाऱ्यांनी मातीचे संरक्षण, भूजलपातळी वाढ, प्रदूषण नियंत्रण, आणि ऑक्सिजन निर्मिती या बाबींचा साध्या भाषेत उल्लेख करत सतत व समृद्ध पर्यावरणासाठी वृक्षारोपणाचे योगदान स्पष्ट केले.
कार्यक्रमाला कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे, शरद भांड, कृष्णदेव कदम, तसेच ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे, सरपंचा आमिषा अजित गमरे, उपसरपंचा भक्ती धनावडे, माजी पं.स. सदस्य प्रभाकर शिर्के, माजी सरपंच प्रमोद शिर्के, ग्रा.पं. अधिकारी युनियनचे अध्यक्ष साईनाथ बागूल, कृषी महाविद्यालय खरवतेचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, जिल्हा परिषद शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक दशरथ कदम व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समारोपात ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे, तसेच शेतकरी विजय भिकू रामाणे यांचे विशेष आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

