(गुहागर)
चिपळूण-गुहागर मार्गावरील गुहागर न्यायालयासमोर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. मृत दुचाकीस्वाराचे नाव संजय वसंत कानसरे (वय ४५, रा. वरचापाट, दुर्गादेवीवाडी, गुहागर) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय कानसरे हे १४ जून रोजी सायंकाळी त्यांच्या मालकीच्या सुझुकी ॲक्सेस (MH-08 AS-2086) या दुचाकीवरून शृंगारतळी येथून गुहागरकडे जात होते. दरम्यान, गुहागर न्यायालयासमोर त्यांच्या दुचाकीची एका इको कारशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की संजय कानसरे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांचे भाऊ दीपक वसंत कानसरे यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संजय कानसरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (आमृ.) क्रमांक २४/२०२६ अंतर्गत करण्यात आली आहे. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित इको कारचा चालक, अपघाताची परिस्थिती आणि अन्य बाबींचा तपास गुहागर पोलीस करत आहेत.

