(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी विद्यापीठाच्या झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट देऊन चालू संशोधन व विस्तार कार्याचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी नव्याने नियुक्त झालेले वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी कुलगुरूंचे औपचारिक स्वागत केले. त्यानंतर डॉ. भावे यांनी संशोधन केंद्राच्या तलाव परिसराची पाहणी केली. तलावांमध्ये चालू असलेल्या मत्स्य संवर्धन प्रकल्पांबाबत तसेच येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बोयर मासा जातीच्या बियाण्यांचे तलावात संवर्धन करण्याची सूचना त्यांनी दिली.
मत्स्य संवर्धन प्रयोगशाळा, शोभिवंत माशांचे बीजोत्पादन, शैवाळ बीज बँकेचा प्रयोग, अक्वापोनिक प्रकल्प, पाणवनस्पती संवर्धन यांसारख्या विविध उपक्रमांची डॉ. भावे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे ‘विद्यापीठ परिभ्रमण निधी’ अंतर्गत सुरू असलेले ‘मत्स्यालय व संग्रहालय प्रदर्शन’ आणि ‘तलावामधील नौकाविहार’ प्रकल्पही त्यांनी पाहिले. या प्रकल्पांची प्रशंसा करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या सहभागासाठी केंद्राने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.
पेठकिल्ला, रत्नागिरी येथील संशोधन केंद्राच्या नविन इमारतीच्या बांधकामाबाबत सुद्धा यावेळी चर्चा झाली. तसेच संशोधन केंद्राच्या भविष्यातील शेतकरी हिताच्या उपक्रमांसाठी विविध सकारात्मक सूचना डॉ. भावे यांनी दिल्या.
या अभ्यासदौऱ्यावेळी केंद्राचे सहायक प्राध्यापक व अधिकारी डॉ. आसिफ पागरकर, डॉ. हरीश धमगये, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, तसेच वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती व्ही. आर. सदावर्ते, श्रीमती अपूर्वा सावंत, लिपिक श्री. सचिन पावसकर, बोटमन श्री. दिनेश कुबल, सहयोगी प्राध्यापक प्रा. एम. टी. शारंगधर, आणि विषयतज्ञ डॉ. वैभव येवले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. आसिफ पागरकर यांनी कुलगुरूंप्रती आभार व्यक्त केले.