(गुहागर / सचिन कुळये)
देव दिवाळी निमित्त तवसाळ गाव पंचक्रोशीतील श्री महामाई–सोनसाखळी देवीचे मंदिर आकर्षक रोषणाईने उजळून निघाले. अरबी समुद्र व शास्त्री नदीच्या संगमावर वसलेले, समृद्ध परंपरा आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर या विशेष दिवशी भक्तांनी फुलून गेले होते.
देव दिवाळीच्या निमित्ताने माहेरवाशिणींचा मान राखणारी, ब्रिटिश काळातही ज्यांचे सामर्थ्य मान्य केले गेले अशी श्री महामाई, सोनसाखळी, श्री देव रवळनाथ, त्रिमुखी आणि सोमजाई देवस्थाने विशेष सजविण्यात आली. श्री महामाई सोनसाखळी मंदिर ट्रस्टच्या संयोगाने मंदिर रंगरंगोटी, अलंकारसज्जा आणि आकर्षक रोषणाईने खुलून दिसत होते. देव दिपावली उत्सव जागर सोहळा यथायोग्य पार पडला.
भक्तांच्या समोर देवांना परिधान केलेली विशेष ‘रुपा’ वस्त्रे आणि चढविण्यात आलेले अलंकार लक्षवेधी ठरले. परिसरात साऊंड सिस्टिमवर वाजणाऱ्या मंगलमय संगीतामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले. पंचक्रोशीतील भजनी मंडळांना आमंत्रित करण्यात आले होते. “श्री महामाई, सोनसाखळी, रवळनाथ, त्रिमुखी, सोमजाई देवाचे गुणगान… पाहून तुझे रूप… होऊ भजनात दंग…” अशा जयघोषात भाविकांनी उत्सव साजरा केला.
या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, पुणे आणि गुहागर तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भाविकांनी देवीसमोर साद घातली.
गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेले मंदिराचे जिर्णोद्धारकाम (जिणोंद्वार) मोठ्या प्रमाणात पूर्णत्वाकडे जात असून नव्याने केलेली रंगरंगोटी, आकर्षक घुमट सजावट आणि गाभाऱ्याची आरास परिसराला नवजीवन देत आहे.
तवसाळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ, देवीचे मानकरी, मंदिराचे पुजारी गुरव बंधू तसेच श्री महामाई सोनसाखळी मंदिर ट्रस्ट तवसाळ यांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे आभार मानले.

