(गुहागर / सचिन कुळये)
गुहागर तालुक्यातील उमराठ आणि हेदवी या दोन्ही गावांची ग्रामदेवता असलेल्या श्री नवलाई देवीचा वार्षिक उत्सव यंदा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे ३५० वर्षांपूर्वीचे हे जागृत देवस्थान असल्याने या उत्सवाला दोन्ही गावांतील ग्रामस्थ, मानकरी आणि भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात.
श्री नवलाई देवी मंदिरात कोकणातील अनेक प्रमुख देव-देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. यामध्ये सिद्धेश्वर, चिनकोबा, नवलाई, त्रिमुखी, पावणाई, भराडा, कालकी, मानाई आणि विठ्ठलाई या देवतांचा समावेश आहे. मंदिर परिसरात या सर्व देवतांसमोर त्यांच्या शिपाई (रखवालदार) देवतेचीही स्थापना करण्यात आली आहे.
या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘लाट’ ओढण्याची अनोखी परंपरा. लाट ओढण्यासाठी दोन्ही बाजूंना सुमारे २५ ते ३० फूट लांबीची वेल बांधली जाते. विशेष म्हणजे ही वेल प्रत्येक वर्षी एकाच ठिकाणी जंगलात मिळते, ही गोष्ट ग्रामस्थांच्या मते अद्भुत आणि चमत्कारिक मानली जाते.
उत्सवाच्या दिवशी मानकरी आणि ग्रामस्थ मंदिरात एकत्र येऊन देवतांची ‘रुपे’ लावण्याचा विधी, लाट खाली उतरवणे, ती धुऊन काढणे आणि जंगलातून आणलेल्या काकरा नदीच्या वेली लाटेला बांधणे असे पारंपरिक विधी पार पाडतात.
भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून श्री नवलाई देवीची ख्याती आहे. येथे साधनेसाठी बसणाऱ्या भाविकांना विशेष समाधान व शांततेचा अनुभव आल्याचे अनेक भक्त सांगतात. हेदवी आणि उमराठ गावातील ग्रामस्थ या ग्रामदेवतेचे सर्व सण, उत्सव आणि पारंपरिक रितीरिवाज अतिशय निष्ठेने पाळतात.

