(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित आल्याच्या पार्श्वभूमीवर तुरळ येथे एकत्र जमले आणि जल्लोष साजरा केला. जुन्या मतभेदांना मागे टाकून, नव्या जोमाने एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार यावेळी दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील एकात्मतेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना, कडवई जिल्हा परिषद गटातही याचे प्रतिध्वनी जाणवले. मुंबई-गोवा महामार्गालगत तुरळ येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत, एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमात मनसेचे जितेंद्र चव्हाण यांनी भाषण करताना सांगितले, “मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी राज आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले आहेत. आपणही आपले मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने कार्य करूया.” शिवसेना (उबाठा) गटाचे विभागप्रमुख अनंत उजगावकर यांनीही, “नव्या पर्वाची सुरुवात आपण सर्वांनी एकत्र येऊन करायची आहे. कार्यकर्त्यांनी हे संधीचे रूपांतरण शक्तीत करावे,” असे आवाहन केले.
या वेळी विजय कुवळेकर, उपविभागप्रमुख अरविंद जाधव, दत्ता लाखन, युवधिकारी अजिंक्य ब्रीद, शाखाप्रमुख संदीप चिले, सुजित पडव, विष्णू इंजले, विजय दुदम, अशोक उजगावकर, प्रमोद शिंदे, तसेच मनसेचे नंदकुमार फडकले, उदय चाचे, विजय बामणे, कृष्णा पाचकले, रघुनाथ येलोंढे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : शिवसेना व मनसेचे कार्यकर्ते एकत्र येत जल्लोष करताना.

