(संगमेश्वर / एजाज पटेल)
डिंगणी–पिरंदवणे मुख्य रस्त्यावर गवा रेड्यासारख्या बलाढ्य व आक्रमक वन्य प्राण्याची खुलेआम भटकंती सुरू असल्याने परिसरात भीती नव्हे तर थेट मृत्यूची चाहूल लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आधीच बिबट्याच्या दहशतीखाली जगणाऱ्या नागरिकांवर आता गव रेड्याच्या भीतीचे सावट गडद झाले असून, सामान्य जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
आतापर्यंत केवळ नावाने ऐकलेला व चित्रात पाहिलेला गवारेडा आता प्रत्यक्षात मानवी वस्तीत, शेतशिवारात आणि मुख्य रस्त्यावर दिसू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. पहाटे-सायंकाळी रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे बनले असून, कोणत्याही क्षणी अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. शेतीसाठी शिवारात जाण्याचे धाडस होत नसल्याने शेतीकामे ठप्प झाली आहेत. उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच, दुसरीकडे शाळेत जाणारी लहान मुले भीतीपोटी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. पालक वर्ग अक्षरशः हतबल झाला आहे.
इतका गंभीर प्रश्न असतानाही वनविभागाकडून ठोस व प्रभावी कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही. गवा रेड्यासारखा धोकादायक प्राणी मानवी वस्तीत मोकळेपणाने फिरत असताना प्रशासनाची ही उदासीनता धक्कादायक असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
एखादी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. वनविभागाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन गवा रेड्याचा बंदोबस्त करावा, त्याला सुरक्षितपणे जंगलात हलवावे व नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

