(राजापूर)
शहरात आषाढी एकादशी व मोहरम निमित्त मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी पोलिसांच्या नजरेखालून सुटत दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या केल्या. यामध्ये लॅविश अपार्टमेंटमधून सुमारे १३ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही माहिती पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. अवघ्या महिन्याभरात राजापूर शहरातील ही दुसरी मोठी घरफोडीची घटना घडल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
लॅविश अपार्टमेंटमधील फ्लॅट हा आठवडा बाजार परिसरात फळ विक्री करणारे संतोष भाबुद्रे यांचा आहे. शनिवारी संतोष काही कामानिमित्त बाहेर गेले होते, तर त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मावशी हे रानतळे येथील पिकनिक पॉईंटला गेले होते. संध्याकाळी सर्वात आधी संतोष भाबुद्रे घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा होता, तसेच आतील कपाटे उघडून अस्ताव्यस्त टाकलेली दिसली.
घरातील सुमारे ७ लाख रुपये रोख रक्कम आणि ६ लाखांचे दागिने, असा एकूण १३ लाखांचा ऐवज चोरीस गेला असल्याचे त्यांनी पोलीसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यामागे कोणीतरी माहिती असलेला व्यक्ती असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, आषाढी एकादशी आणि मोहरम यामुळे शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात असतानाही ही घटना घडल्यामुळे शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिन्याभरात ही दुसरी मोठी घरफोडी असून, यापूर्वी कोंडये येथे चार घरे फोडली गेली होती.
लॅविश अपार्टमेंटमध्ये एकूण ११ फ्लॅट आहेत. त्यापैकी तीन फ्लॅट कायमस्वरूपी बंद असतात तर उर्वरित फ्लॅटमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत. बहुतांश रहिवासी त्या दिवशी बाजारात गेल्याची माहिती असून, ही संधी साधून चोरट्यांनी ही घरफोडी केली.
दुसरी घटना सिंधुरत्न अपार्टमेंटमध्ये:
शनिवारी रात्री पेट्रोल पंपासमोरील सिंधुरत्न अपार्टमेंटमधील ‘ए’ विंगमध्ये, यशवंत साईनाथ महाडीक यांच्या फ्लॅटचे दार तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र घरात काहीही न सापडल्यामुळे चोरटे हात हलवून पसार झाले.
या दोन्ही घटनांमुळे राजापूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राजापूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

