(रत्नागिरी)
आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्ताने ‘सहकारातील संधी’ या विषयावर विविध हायस्कूल्स व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम अॅड. दीपक पटवर्धन आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. युवकांमध्ये सहकार चळवळीची ओळख निर्माण व्हावी, तसेच सहकार क्षेत्रातील संधींबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवनिर्माण महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना अॅड. पटवर्धन म्हणाले, “सहकार चळवळ ही लोकांनी लोकांसाठी चालवलेली आणि लोकशाही कार्यपद्धतीनुसार राबवली जाणारी व्यवस्था आहे. समान उद्दिष्ट ठेवून एकत्र आलेला लोकसमूह सहकारी संस्था स्थापन करू शकतो. विविध प्रकारच्या उद्दिष्टांसाठी संस्था नोंदवता येते आणि त्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक यंत्रणा उभारता येते.”
सहकार क्षेत्राची वैशिष्ट्ये अत्यंत सहज आणि समजण्यासारख्या पद्धतीने पटवर्धन यांनी मांडली. “संस्थेचे सभासद हेच मालक असतात. त्यांनी गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणानुसार अधिकार ठरत नाहीत, तर प्रत्येक सभासदास समान अधिकार मिळतो, हेच सहकाराचे वैशिष्ट्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “सहकार हा नफेखोरीपेक्षा साधनांचा प्रभावी वापर करत उत्पादकता वाढवण्याचा मार्ग आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या समोर सहकार ही जनसामान्यांची उभी केलेली भक्कम ताकद आहे,” असे ते म्हणाले.
युवकांसाठी सहकार क्षेत्रात रोजगार, व्यवसाय व नेतृत्वाच्या संधी उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने अमितभाई शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी सोपवल्यानंतर ग्रामीण भागातील सहकारी संस्थांना नवसंजीवनी मिळाली असून, त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. युवकांनी या संधींचा शोध घेत सहकार चळवळीत सहभागी व्हावे आणि नवतंत्रज्ञानाचा उपयोग करून विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य, सहायक निबंधक रावसाहेब पाटील तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते. याच उपक्रमाअंतर्गत अॅड. दीपक पटवर्धन यांनी जकादेवी हायस्कूल आणि पटवर्धन हायस्कूल येथेही विद्यार्थ्यांना ‘सहकारातील संधी’ या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.