(जैतापूर / राजन लाड)
नाटे सागरी पोलीस ठाण्यातील गणरायांचे विसर्जन सोहळा सोमवारी मोठ्या जल्लोषात आणि भक्तीभावाने पार पडला. पोलीस ठाण्याच्या आवारात प्रतिष्ठापित केलेल्या बाप्पांची मिरवणूक दुपारी ४ वाजता ढोल-ताशा, बॅन्जोच्या गजरात तसेच पुष्पवृष्टीच्या वर्षावात सुरू झाली. नाटे बाजारपेठेतून मार्गक्रमण करत बंदकरवाडी खाडीपर्यंत ही मिरवणूक गेली आणि तेथे श्रींचे विधिपूर्वक विसर्जन करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून सागरी पोलीस ठाण्यात गणरायांची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सव काळात कर्तव्यावर व्यग्र असलेले सर्व पोलीस बांधव आपल्या कार्यक्षेत्रातील गणेशोत्सव निर्विघ्न, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतात. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी, कार्यबाह्य झाल्यानंतर, एकत्रितपणे सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या स्टेशन परिसरात विराजमान झालेल्या गणरायाचे विसर्जन करतात. ही परंपरा पोलीस दलातील एकोपा, श्रद्धा आणि भक्तिभाव अधोरेखित करणारी ठरते.
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते. त्यांच्यासोबत सर्व कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाटे खाडी परिसर “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषांनी दुमदुमून गेला होता.
पोलिस बांधव गणेशोत्सव काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने आधी आपले कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडतात आणि नंतर भक्तिभावाने आपल्या बाप्पाला निरोप देतात. धार्मिकतेसोबतच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणारा हा सोहळा प्रत्येक वर्षी स्थानिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो.

