(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली प्रवासी जेटी परिसरात सध्या गंभीर स्थिती निर्माण झाली असून बर्फ, पाणी व मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बेदरकार हालचालींमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही वाहनमालकांकडून अप्रशिक्षित परप्रांतीय चालकांकडे वाहने सोपवली जात असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
धाऊलवल्ली येथील जेटी मूळतः प्रवासी वाहतुकीसाठी आहे. यापूर्वी बंदर विभागाने येथे मत्स्य व्यवसायाच्या होड्या किंवा बोटी लावू नयेत, असा स्पष्ट सूचना फलक लावला होता. मात्र हा फलक सध्या गायब असून गेल्या तीन ते चार वर्षांपासून या जेटीवर मोठ्या प्रमाणावर मच्छीच्या लॉन्च उभ्या राहत आहेत. मासळी उतरवणे, एजंटांकडून मोठ्या वजनकाट्यांवर खरेदी-विक्री व्यवहार करणे, तसेच लॉन्चवर पाणी भरणे आणि बर्फ चढविण्याची कामे खुलेआम सुरू आहेत.
या प्रकारांमुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. धाऊलवल्ली ग्रामपंचायतीमार्फत संबंधित व्यावसायिक संघटना, मत्स्य व्यवसाय अधिकारी आणि पोलिस प्रशासनाकडे गेल्या काही वर्षांत वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. तरीही प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
मासळी वाहतुकीमुळे जेटी परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून अनेकदा वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. काही व्यावसायिक नियमांचे पालन करून व्यवसाय करत असले तरी काहीजण अत्यंत उर्मटपणे वागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, जेटी परिसरात दोन मंदिरे असून दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे परिसराच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच जेटीवरून जैतापूर खाडी व जुवे बेट येथे जाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र वाढत्या अस्वच्छतेमुळे पर्यटकही पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
परिस्थिती अधिक धोकादायक करणारी बाब म्हणजे जेटीवरून नाटेकडे जाणारा तीव्र चढ-उताराचा रस्ता. या मार्गावरून मच्छी वाहतूक करणारे टेम्पो वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः काही वाहनांवर अप्रशिक्षित चालक बेदरकारपणे वाहन चालवत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.
या सर्व बाबींकडे लक्ष वेधूनही मच्छीमार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. प्रामाणिक व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संयम बाळगत असताना काही जण त्याचाच गैरफायदा घेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
परिसरात दुर्गंधी पसरवणारे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणारे तसेच अप्रशिक्षित चालकांकडे वाहने देणाऱ्यांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वेळेत सुधारणा न झाल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

