(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील प्रलंबित अतिक्रमणे हटविण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद आता आक्रमक झाली आहे. वारंवार सूचना देऊनही अनधिकृत बांधकामे स्वतःहून न हटवल्याने येत्या शुक्रवारपासून या मार्गावरील बेकायदेशीर गाळे आणि वाढीव बांधकामांवर पालिकेचा हातोडा चालणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रत्नागिरी विमानतळ विस्तार प्रकल्प आणि रस्ते रुंदीकरणाच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विमानतळासाठी ११ केव्ही क्षमतेची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित असून, रस्त्यालगत उभारलेली अनधिकृत बांधकामे या कामात मोठा अडथळा ठरत आहेत. परिणामी विकासकामांना गती देण्यासाठी अतिक्रमण हटविणे अपरिहार्य असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. फेब्रुवारी महिन्यात पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विमानतळ विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम राबविण्यात आली होती. त्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने सुमारे २५ ते ३० टक्के अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, कोकणनगर परिसरातील काही गाळेधारकांनी बांधकामे स्वतःहून काढून घेण्याची विनंती केल्याने प्रशासनाने कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली होती.
गाळेधारकांना देण्यात आलेली एक महिन्याची मुदत संपूनही अद्याप अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याने विकासकामे रखडली आहेत. विशेषत: महावितरणला भूमिगत विद्युत वाहिनी टाकताना अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने अंतिम नोटीस बजावून दोन दिवसांच्या आत बांधकामे न काढल्यास ती पाडली जातील, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
दरम्यान, शुक्रवार, ६ मार्च रोजी सकाळी कारवाईला प्रारंभ होणार असून, चर्मालय ते कोकणनगर दरम्यानचा मार्ग पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. संभाव्य तणाव लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडे चोख बंदोबस्ताची मागणीही करण्यात आली आहे. विकासकामे आणि कायद्याची अंमलबजावणी यामधील संतुलन राखत शहराला अतिक्रमणमुक्त करण्याच्या दिशेने पालिकेने टाकलेले हे पाऊल निर्णायक ठरणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

