( रत्नागिरी )
पावसाळ्यात समुद्राला आलेल्या उधाणामुळे मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला मोठा तडाखा बसला आहे. अजस्त्र लाटा बंधाऱ्यावर धडकत असल्याने नव्याने उभारण्यात आलेल्या टप्प्यातील टेट्रापॉड सरकले असून, पायाखालची वाळू आणि दगडही हलले आहेत. त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या मिऱ्या बंधाऱ्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये सात धोकादायक (डेंजर) झोनपैकी एक टप्पा वगळता उर्वरित सर्व ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा १२०० मीटरचा टप्पा अद्याप अपूर्ण असून, याच भागात समुद्राच्या लाटा धडकत असल्याने नुकतेच बसविण्यात आलेले टेट्रापॉड सरकले आहेत.
भाटकरवाडी परिसरात या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच रत्नागिरी दौऱ्यावर असताना मिऱ्या बंधाऱ्याची पाहणी केली. काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पत्तन विभागानेही काही दिवसांपूर्वी ठेकेदार कंपनीसोबत बैठक घेऊन बंधाऱ्याच्या उर्वरित आणि टॉपच्या कामास गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.