( राजापूर /प्रतिनिधी )
कौटुंबिक वादातून राजापूर येथे पतीने पत्नीला स्टीलच्या बाटलीने मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना १३ जून २०२५ रोजी पहाटे १ ते १.३० च्या सुमारास कशेळी गावात सूर्य मंदिराजवळ घडली. या मारहाणीमध्ये पीडितेच्या डाव्या हाताची बोटं फॅक्चर झाली असून, उपचाराऐवजी आरोपी तिला जखमी अवस्थेत सोडून घटनेनंतर फरार झाला.
शुभांगी नयेंद्र भोईर (वय ४२, सध्या रा. रुखुमाबाई चाळ, देवीचापाडा, डोंबिवली पश्चिम, मुळ रा. कशेळी, ता. राजापूर) यांनी याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्या आणि त्यांचे पती तुशार एकनाथ मिस्त्री हे जमिनविवादाच्या प्रकरणासाठी राजापूर न्यायालयात हजर राहण्यासाठी आले होते. कोर्टातील तारखेनंतर दोघेही कशेळी येथील घरात गेले.
त्या ठिकाणी आरोपी तुशार मिस्त्री यांनी पत्नी शुभांगी यांना वाईटसाईट शिवीगाळ करत घराबाहेर हाकलून देत स्टीलच्या पाण्याच्या बाटलीने डाव्या हातावर मारहाण केली. या मारहाणीत शुभांगी यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला फॅक्चर झाले. मात्र, त्यांच्यावर कोणताही वैद्यकीय उपचार न करता आरोपी घटनास्थळावरून निघून गेला.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४२/२०२५ नोंदवण्यात आला असून, आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(२), ११५(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.