(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, संस्कार समिती आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १८ निवेंडी वरची भीमनगर यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लुंबिनी बुद्ध विहारात वर्षावास सांगता धम्म प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगता कार्यक्रमामध्ये मुंबई येथील बौद्ध धम्मगुरु भदंत संघराज यांच्या विशेष धम्मदेसनेचे प्रवचन होणार आहे. तर हा कार्यक्रम निवेंडी गावशाखेचे अध्यक्ष चंद्रकांत कदम यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे सभापती संजय आयरे, चिटणीस रविकांत पवार आदींसह संस्कार समितीचे सर्व श्रामणेर व बौद्धाचार्य, गाववार शाखांचे पदाधिकारी आणि धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये प्रारंभी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण, गंध व दीपप्रज्वलन, उपस्थितांचे स्वागत, बुद्ध वंदना,धम्म प्रवचन, स्नेहभोजन, आभारप्रदर्शन अशा स्वरूपात कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे. या सांगता कार्यक्रमासाठी निवेंडी गावशाखेकडून लुंबिनी बुद्ध विहाराची रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई व उत्तम प्रकारची सजावट अशा प्रकारे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
हा संपूर्ण सांगता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवेंडी गावशाखेतील स्थानिक सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला मंडळाचे पदाधिकारी व सर्व सदस्य आणि मुंबई मंडळाचे पदाधिकारी व सदस्य विशेष मेहनत घेत आहेत. या विशेष धम्म प्रबोधन सांगता कार्यक्रमाला तालुक्यातील धम्म बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वरची निवेंडी गावशाखेचे अध्यक्ष चंद्रकांत कदम आणि तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी केले आहे.

