(लांजा)
शहरातील राजदीप मोबाईल शॉपीत मोबाईल खरेदीच्या बहाण्याने एकाने बनावट अॅपद्वारे पेमेंट केल्याचा बनाव करत तब्बल ३६,९९९ रुपयांचा मोबाईल फोन फसवणुकीने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ८ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.
याप्रकरणी दुकानाचे मालक प्रकाश विद्यानंद शर्मा (वय ३५, रा. वावधनकर चाळ, वैभव वसाहत) यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एक व्यक्ती दुकानात येऊन ‘Vivo V50’ हा मोबाईल खरेदी करत असल्याचे सांगितले. त्याने PhonePe अॅपद्वारे रक्कम भरल्याचा भास निर्माण केला. मात्र, प्रत्यक्षात त्याने बनावट पेमेंट अॅपचा वापर करून दुकानाला चुना लावला.
या तक्रारीनंतर लांजा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.