(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
वारकरी संप्रदायासाठी आनंद, श्रद्धा आणि भक्तीने ओतप्रोत असलेला आषाढ महिना… विठ्ठलनामाच्या गजरात न्हालेली महाराष्ट्राची भूमी… आणि याच भक्तिरसात मिसळलेली एक विलक्षण कलाकृती! देवरुखचे जागतिक विक्रमप्राप्त रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त साकारलेली ‘पाण्याखालील विठ्ठल रांगोळी’ ही प्रेक्षकांसाठी एक अपूर्व दृश्यरम्य मेजवानी ठरली आहे.
रंग आणि भक्तीचा संग यांचा अनोखा संगम घडवताना रहाटे यांनी जुन्या पितळेच्या परातीत सप्तलिंगी नदीचे पाणी भरले आणि त्यात रेखाटली विठुरायाची सोज्वळ मूर्ती. विविध रंगांची रांगोळी पाण्याखाली साकारताना लागणारी अत्युच्च कलाकौशल्य, स्थैर्य आणि तंत्रज्ञान याचा सुरेख मिलाफ अवघ्या एका तासात त्यांनी साकारला. पाहताक्षणी हृदयात भक्तिभाव जागवणारी ही जलरांगोळी प्रेक्षकांमध्ये श्रद्धा व आश्चर्य यांची लहर निर्माण करते आहे.
विलास रहाटे यांनी यापूर्वीही मोरपीस, तुळशीपत्र, सुपारीसारख्या नाजूक माध्यमांवर विठुरायाची छबी साकारून देशभरातील कलाप्रेमींचे आणि भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत संस्कृती आणि परंपरा या विषयावर विठ्ठल, वारकरी व दिंडी यांची रांगोळी साकारून राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले होते.
त्यांचा कलाविश्वातील वारसा आजही ते मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढे नेत आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांनीही त्यांच्या प्रेरणेने अनेक राष्ट्रीय सन्मान मिळवले आहेत. रहाटे यांची ही जलरांगोळी म्हणजे केवळ एक कलाकृती नाही, तर भक्तीरसाने ओतप्रोत भरलेली एक जीवंत अनुभूती आहे. जणू विठुरायाच पाण्यातून प्रकटल्यासारखा!