(लांजा-रत्नागिरी /प्रतिनिधी)
हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या कोकणातील लांजा तालुक्यातील एका छोट्या गावातील विकासाची चाकं मात्र ठप्प झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. ग्रुप ग्रामपंचायत वाघ्रटवाडी–लिंबू अंतर्गत येणाऱ्या बौद्धवाडीत जाणारा देखणा पण अतिशय तीव्र उतार असलेला हा रस्ता आज जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ग्रामसभांमध्ये, पत्रव्यवहारांतून आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे वारंवार मागणी करूनही या रस्त्यासाठी निधी मंजूर होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विद्यमान सरपंच असोत वा माजी आमदार राजन साळवी यांना प्रत्यक्ष रस्त्याची अवस्था दाखवूनही प्रस्तावांना मंजुरी मिळत नसणे ही केवळ दिरंगाई नसून, ग्रामीण जीवनाशी चाललेली थट्टाच असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. रस्त्याची दुरवस्था इतकी वाढली आहे की वाहनचालक या मार्गावरून जाण्यास धजावत नाहीत. अशा परिस्थितीत एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूकच बंद पडली तर वयस्कर, आजारी नागरिकांनी तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात जायचे तरी कसे, असा संतप्त सवाल बौद्धवाडीतील ग्रामस्थ करत आहेत. सरपंचांकडे चौकशी केली असता ‘प्रस्ताव पाठवला आहे’ हेच ठरलेले उत्तर मिळते. मात्र मग या रस्त्याचा प्रश्न नेमका कुठे अडला आहे, याचे उत्तर देण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीतील संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांसह जाब विचारणार असल्याची ठाम भूमिका भीम आर्मी कोकण प्रदेश अध्यक्ष प्रीतेश पवार यांनी जाहीर केली आहे. विकासाच्या नावाखाली फक्त कागदी घोडे नाचवण्याऐवजी प्रत्यक्षात लोकांच्या जीविताशी निगडित प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हिरव्या कोकणाच्या कुशीत वसलेल्या या बौद्धवाडीतील रस्त्याचा प्रश्न आता केवळ विकासाचा न राहता मानवी सुरक्षिततेचा बनला असून, प्रशासन या वास्तवाकडे डोळे उघडून पाहणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार, याकडे आता लक्ष लागले आहे..

