(नवी मुंबई)
नवी मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नराधम बापाने पोटच्या दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा प्रकार समोर आला असून, गुन्हे शाखेने दोन्ही मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणातील बाप फरार झाला असून, दलालाला पोलिसांनी अटक केली आहे.
बेलापूरमध्ये छापा; 14 आणि 16 वर्षीय मुलींची सुटका
नवी मुंबईतील बेलापूर परिसरात अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापेमारी केली. कारवाईदरम्यान 14 आणि 16 वर्षीय दोन अल्पवयीन मुलींचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ दोन्ही मुलींची सुटका केली.
धक्कादायक उलगडा: गुन्ह्यामागे चक्क वडील
सखोल तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली. मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावणारी व्यक्ती चक्क त्यांचे वडीलच असल्याचे निष्पन्न झाले. हा नराधम बाप दलालाच्या माध्यमातून मुलींना विविध ग्राहकांकडे पाठवत होता आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांवर घर चालवत होता, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
पोक्सो आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा
या प्रकरणी बाप आणि दलालाविरोधात पोक्सो तसेच पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या एसीपी प्रेरणा कट्टे यांनी दिली. दलालाला अटक करण्यात आली असून, फरार बापालाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या अमानुष घटनेनंतर शहरात तीव्र रोष आहे. संबंधित नराधम बापाला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

