(वार्ताहर / पाली)
तालुक्यातील नाणिज येथील रेवाळेवाडीत बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे एक जुने आंब्याचे झाड घरावर कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना बुधवारी (१ जुलै) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नू सूर्याजी रेवाळे यांच्या घराशेजारील जुने व मोठे आंब्याचे झाड जोरदार वाऱ्यामुळे मुळासकट उन्मळून त्यांच्या घरावर कोसळले. या दुर्घटनेत घरावरील पत्र्यांचे छप्पर, लोखंडी बार, संरक्षक भिंत आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले.

घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य करत झाड बाजूला केले आणि घरातील लोकांना सुरक्षित बाहेर काढले. यानंतर महसूल विभागाच्या ग्रामअधिकारी प्रियांका ढोबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. या अहवालानुसार सुमारे २,१०,००० रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, गावचे पोलीस पाटील नितीन कांबळे, सरपंच विनायक शिवगण, माजी सरपंच दत्ताराम शिवगण, तसेच गौरव संसारे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व मदत कार्यात सहभाग घेतला.

