(नवी दिल्ली)
२०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला मोठा झटका बसला आहे. या प्रकरणात तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याची विनंती दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
न्यायमूर्ती अनिश दयाल यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस आली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात दाखल केलेल्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रासोबतच, दिल्लीच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची कार्यवाहीही रद्द करण्याची विनंती जॅकलीनकडून करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्यात कोणताही हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला.
सुकेश चंद्रशेखर या कथित ठगाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जॅकलीनचे नाव सहभागी असल्याचा आरोप असून, ईडीने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे जॅकलीनविरोधातील खटल्याला पुढे गती मिळण्याची शक्यता आहे.