(बिलासपूर /हिमाचल प्रदेश)
हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. झंडूता विधानसभा क्षेत्रातील बरठीं परिसरात झालेल्या भूस्खलनात प्रवासी बसवर प्रचंड दरड कोसळल्याने १८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूरमधील भल्लू पुलाजवळ ही दुर्घटना घडली. बसमध्ये सुमारे ३० प्रवासी प्रवास करत होते. दरड कोसळल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना घुमारवी आणि झंडूता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिलासपूर परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगराळ भागातील माती सैल झाली होती. त्यामुळे उतार खचून दरड कोसळल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू
अपघाताची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य करत मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिकदेखील प्रशासनाला मदत करत आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. “राज्य सरकार या कठीण प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांसोबत ठामपणे उभे आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदतकार्य वेगाने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री सुक्खू यांनी जखमींना तत्काळ आणि प्रभावी उपचार मिळावेत, यासाठी वैद्यकीय सोयींची पूर्ण व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. शिमलामधून ते संपूर्ण परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून आहेत.

