( रत्नागिरी /प्रतिनिधी )
शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ विजेचा शॉक लागून एका दुभत्या म्हैशीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या अंडरग्राऊंड केबलच्या दोषामुळे हा प्रकार घडला असून, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मुक्या जनावराचा बळी गेला आहे. या घटनेमुळे प्रशासनावर गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
अरिहंत बिल्डिंगजवळील पथदीपाच्या लोखंडी खांबाला वीज प्रवाहित असल्याचे स्थानिकांनी सांगितले. रात्रीच्या सुमारास या खांबाच्या संपर्कात आल्याने म्हैशीला विजेचा जोरदार धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची शक्यता आहे. सकाळी नागरिकांना ही म्हैस मृतावस्थेत आढळून आली. त्यांनी तत्काळ रत्नागिरी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृत म्हैस उचलून नेली. या घटनेमुळे महावितरणच्या अंडरग्राऊंड केबल व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. रस्त्यालगत उघड्यावर प्रवाहित झालेले वीज खांब, तुटलेल्या किंवा उघड्या केबल्समुळे नागरिक आणि जनावरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. “आज म्हैस गेली, उद्या एखाद्या माणसाला शॉक लागला असता तर?” असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
महावितरण आणि नगर परिषदेच्या यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेने समोर आले आहे. वारंवार अंडरग्राऊंड केबल्सची तपासणी, देखभाल व दुरुस्ती याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षिततेच्या नावाखाली खर्चाचा बडगा उचलणाऱ्या महावितरणने आता तरी जबाबदारी स्वीकारून या घटनेची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा प्रशासनाची झोप असेच बळी घेत राहील.

