(लांजा)
तालुक्यातील गवाणे येथे गुरुवारी (ता. ३ जुलै) सकाळी एका काजू बागेत बिबट्या फासात अडकलेला आढळून आल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वन विभागाच्या तत्परतेमुळे बिबट्याला सुखरूप पकडून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
गवाणे येथील श्री. गणू बाबू करंबळे यांच्या मालकीच्या गट नंबर ९०० या काजू बागेमध्ये बिबट्या फासात अडकलेला असल्याची माहिती श्री. सुरेश तानाजी करंबळे यांनी वन विभागाला भ्रमणध्वनीद्वारे दिली. या माहितीची तातडीने दखल घेत वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला सुरक्षितपणे लोखंडी पिंजऱ्यात पकडण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी लांजा यांच्या मार्फत त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तो अंदाजे दोन वर्षांचा नर असून तो पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले, अशी माहिती विभागीय वन अधिकारी (प्रा.) श्रीमती गिरजा देसाई यांनी दिली.
या रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी (प्रा.) श्रीमती गिरजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत श्री. प्रकाश सुतार (वनपरिक्षेत्र अधिकारी, रत्नागिरी), श्री. राजेंद्र पाटील (वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, राजापूर), श्री. न्हानू गावडे (वनपाल, पाली), श्री. महादेव पाटील (वनपाल, लांजा), तसेच वनरक्षक विक्रम कुंभार, बाबासाहेब ढेकळे, श्रावणी पवार, नमिता कांबळे, सिद्धार्थ हिमगिरे, वनमजूर चंद्रकांत रामाने, आणि प्राणीमित्र दीपक कदम, मंगेश महेश लांजेकर, मयुरेश आंबेकर, मंगेश आंबेकर यांनी सहभाग घेतला. गावातील ग्रामस्थांनीही या मोहिमेत सहकार्य केले. वन विभागाच्या कार्यक्षमतेबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
वन्यप्राणी दिसल्यास किंवा अशा प्रकारच्या घटनांची माहिती द्यावी लागल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरजा देसाई यांनी केले आहे.