(लांजा)
मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड घाटात शनिवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता एक भीषण अपघात घडला. मुंबईहून गोव्याकडे भरधाव वेगाने जाणारी कार अचानक चालकाचा ताबा सुटल्यामुळे अंदाजे ७० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील एक महिला किरकोळ जखमी झाली असून इतर प्रवाशांच्याही सौम्य जखमा झाल्या आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस व वाकेड गावातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. स्वेन मोर्जेलो (वय २१, आगाशे, विरार पश्चिम) हा MH03 DG 2451 क्रमांकाच्या कारमधून तीन प्रवाशांसह गोव्याच्या दिशेने निघाला होता. वाकेड घाटात उतरत असताना वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कार खोल दरीत जाऊन कोसळली. कारमधील प्रवासी क्लाइड डिसोजा (५६, मालवणी मालाड), फ्लाबिया फर्नांडिस (२६, बोरिवली पश्चिम, गोराई) आणि कु. रियोना (१८, आर्लेम, गोवा) यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
या अपघातामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती, मात्र स्थानिकांनी वेळेवर मदत केल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला. पोलीस अधिक तपास करत असून वाहन हटविण्याचे काम सुरू आहे. हा अपघात वेगमर्यादा आणि घाटातील चालकांच्या दक्षतेच्या गरजेवर पुन्हा एकदा प्रकाश टाकणारा आहे.

