(लांजा / प्रतिनिधी)
नगर पंचायतीच्या डंपिंग ग्राउंडविरोधात तब्बल ७८ दिवसांपासून साखळी उपोषणावर ठिय्या मांडून बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी युवासेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.
युवासेना राज्य सहसचिव प्रद्युम्न माने आणि युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी लांजा दौऱ्यादरम्यान उपोषण स्थळी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश करंबळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष हातणकर, लांजा तालुका युवाधिकारी अभिजीत शिर्के तसेच महिला शहर संघटक सिया लोध उपस्थित होते.
ग्रामस्थांशी संवाद साधताना प्रद्युम्न माने म्हणाले, “शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत आपल्या लढ्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. या विषयावर त्यांनी पुन्हा एकदा बैठक बोलावली आहे. वेळ पडल्यास युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातूनही हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
तसेच युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत म्हणाले, माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सुरुवातीपासूनच ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. युवासेनेकडून जे सहकार्य अपेक्षित आहे, ते आम्ही नक्की देऊ, असे ते म्हणाले. प्रसाद सावंत पुढे म्हणाले, प्रशासनालाही ठाऊक आहे की घेतलेला निर्णय चुकीचा आहे. मात्र काहींचे हितसंबंध गुंतलेले असल्याने प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पण तुमची एकजूट पाहता प्रशासनाला न्याय द्यावाच लागेल. तुमच्या लढ्यात युवासेना शेवटपर्यंत सोबत असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कोत्रेवाडी ग्रामस्थ गेल्या ७८ दिवसांपासून लांजा नगर पंचायतीच्या डंपिंग ग्राउंडविरोधात साखळी उपोषणावर आहेत. दीर्घकाळाच्या संघर्षानंतरही अद्याप प्रशासनाकडून कोणताही निर्णय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तथापि, युवासेना पदाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे ग्रामस्थांच्या लढ्याला नवे बळ मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

